नेहमी प्रमाणेच WE चा मेसेज आला, यावेळी ठिकाण होतं सांधण दरी ट्रेक. ऐकून तर होतो, पण जायचा की नाही त्या बाबतीत काही ठरत नव्हतं; त्याच वेळी माझा जिवलग आणि बालमित्र प्रसाद उर्फ आंब्या चा मेसेज आला. मग काय, साथीदार मिळाला. हळू हळू साई आणि महेश ही सोबत येणार हे कळलं. जोरदार तैयारी ही सुरू झाली.
अखेर तो दिवस आला, मी, प्रसाद, साई आणि महेश आम्ही शिवाजी टर्मिनस ला आलो, जवळपास एक तास आधीच आलो होतो, ट्रेन 10.50 ची होती. इथे तिथे टाईमपास करता करता ट्रेन आली, PD तिथेच ट्रेन मध्ये भेटला, बाकी लोक ही होते पण ओळख नव्हती. आम्ही चौघे आपल्याच मस्तीत होतो, कसारा ही आला हे कळलं नाही. तिथे बराच मोठा ग्रुप आहे याची कल्पना आली, कारण ट्रेन मध्ये PD (प्रमोद दुखंडे) ने फॉर्म भरायला दिले होते आणि लिस्ट मध्ये बरीच नाव होती.
मग प्रवास चालू झाला तो जीप मधून. भूक तर आम्हाला लागलीच होती, त्यात आम्ही थांबलो तिथे थोडस काही खाऊन निघुया असा विचार केला, तर तिथे जेवण शिवाय काहीच विशेष नव्हते, ते ठिकाण होते बाबा चा ढाबा. चणा मसाला आणि रोटी वर ताव मारून झाल्यावर आम्ही निघालो.
सांगण्या सारख अस नाही पण आमचा गाडीवाला इतका स्लो होता की सगळे गंतव्य ठिकाणी पोहचून झोपल्यावर आम्ही पोहचलो. हवी तशी झोप नाही झाली, पण इतकी थंडी होती की झाली ती झोप ही छान होती. मग सकाळी मस्त पोहे आणि बिगरसाखरेची चहा. चुकून साखर टाकायची राहून गेली होती वाटत. असो।
मग ओळख सत्र चालू झालं, नेहमीचच, माझं नाव अणि ओळख, असं. 2 लहान मूल ही होती ग्रुप मध्ये, त्यांना पाहून वाटलं की काय उत्साह आहे मुलांमध्ये,आणि एक वेगळा हुरूप ही आला, कारण मी स्वतः हल्ली ट्रेक प्रकार बंद केला होता, त्यात जिम आणि जॉगिंग ही बंद, थोडं टेन्शन होत त्याच। सुरू झाला तो खरा प्रवास, मस्त थंडी च वातावरण, त्यात मित्रांची साथ. निसर्गाच्या सुंदर वातावरणात आणि अप्रतिम कलाकृतीत म्हणजेच सांधण दरी मध्ये प्रवास, गप्पा, मस्करी आणि सेल्फी. बऱ्याच व्हिडीओ मध्ये पाहिलेली वॉटर बॉडी च्या ठिकाणी आलो. तिथे PD आणि सँडी च्या मार्गदर्शनानुसार सर्व मूल पाण्यात उतरली, मग आमच्या बॅग पास केल्या, मग मुली निघाल्या आणि मग आम्ही। पाण्यात गेल्यावर अस वाटलं जणू फ्रिज च पाणी ओतलाय, पण नंतर खूप छान वाटलं, थकवा पूर्णपणे गेला(तसा आला नव्हता म्हणा) त्या नंतर तशाच भिजलेल्या अंगाने चालू झाला पुढचा प्रवास. निघताना सकाळीच आम्ही चपाती आणि भाजी आमच्या डब्यात भरून घेतलं होतं, आणि नंतर ते संपवायची जबाबदारी ही आली.
आता येणार होत ते म्हणजे रॅपलिंग करायचं ठिकाण, सँडी च्या सांगण्या नुसार अर्ध्या तासांवर असणार ठिकाण आम्हाला यायला साधारण 2 ते अडीच तास गेले. (गंमत केली सँडी, खर तर आमचा स्पीड कमी पडला). हळू हळू ग्रुप ची ही ओळख होऊ लागली. खास जॉली वाटलेले म्हणजे आमचे डॉक्टर साहेब आणि सुहास, खूप मदत झाली सर्वाना यांची आणि डॉक्टर तुमच्या मुळे तर ट्रेक मध्ये ही मज्जा आली. डान्सर सुनील ही मस्त माणूस(माफ करा जर नाव सुनील नसेल तर, नाव विसरायची थोडी वाईट सवय आहे, आणि खर सांगतो, अजून डॉक्टरांचं नाव ही माहीत नाही 😁)
चालून चालून पाय दुखायला लागले, चालून कसलं, दगडांवरून उतरून आणि घसरून थकलो होतो, PD मात्र कसाही आणि कुठून ही उड्या मारत जायचा, शेवटी पोहचलो बाबा रॅपलिंग च्या जागी, ऐकून माहीत होतं की साधारण 80 फूट खोल आहे, त्या मुळे खाली पाहूंन मनाचं खच्चीकरण करायचं ही नव्हता, जसा WE चा नंबर लागला तसा प्रसाद पटकन निघाला,मग आम्ही ही 3 घे निघालो मागे मागे, पहिली वेळ होती, थोडी भीती होती (थोडी कसली, फक्त भीतीच होती) स्वतःवर आणि समोरच्यावर (लालू वर – नाव कदाचित बरोबर आहे) भरोसा ठेवून सुरू केलं, नशीब आमचं की डान्सर ने सगळं शूट केलं, नाहीतर आमच्या कडे आठवण ही राहिली नसती. छान आणि सेफ झालं रॅपलिंग. सुनील, लालू आणि PD होते उत्साह द्यायला म्हणून कधी सुरू केलं आणि कधी पोहचलो हेच कळल नाही. खाली मस्त थंड पाण्याचा झरा होता, तब्बल 3 वेळा माझी पाण्याची बाटली भरून माझ्या कंठातून ते अमृत खाली उतरवलं, पाणी तोंडावर मारून मस्त फ्रेश झालो, तेव्हा लगेच कळाल की अजून 2 वेळ अस धाडस करायचेय. मागे पाहतो तर प्रसाद झोपला होता, त्याचा पाय दुखायला लागला होता आणि त्याला चालणं ही कठीण झालेलं। नंतर सुरू झाला प्रवास तो बाकी दिव्य पेलण्याचा. एक जागा आली जिथे रोप च्या मदतीने त्यावर बांधलेल्या गाठीच्या मदतीने उतरायचं होत. डॉक्टर आणि उदय च्या मदतीने सहज उतरलो. धन्यवाद उदय, इथे अस काही सांगितल ज्याने निदान बाकी ट्रेक मध्ये तरी अब्रू वाचली माझी (गुपित आहे, विचारू नका, आभार मानायचे म्हणून लिहिलंय 😁). एक एक टास्क पूर्ण करतोय तोच स्वल्पविराम लागला, निमुळत्या जागेकडे येऊन आम्ही अडकलो, पुढे जायला रस्ता तोच पण मी अडकलो तर ही भीती होती, तस मी जाड आहे म्हणून पण बाकी बारीक लोक ही उगाच टेन्शन घेऊन वाट पाहत होती. पि डी आणि सँडी दोघेही मागे होते, पुढाकार घेतला तो सुहास आणि डॉक्टरांनी, त्या मागे प्रसाद गेला आणि मग वेद( डॉक्टर याचा ट्रेकर बॉय) मग मीच बोललो, मी जातो, मी निघालो तर बाकीचे आरामात येतील, माहीत नाही कोणी ऐकल तरी होत की नाही. मी घुसलो, वाटत तितका छोटी जागा असली तरी आरामात निघालो, खर धाडस तर पुढे वाट पाहत होत, रोप चा झोपाळा करुन उतरायचं होता, खरं तर आमच्या ग्रुप ची ही सोय नव्हती पण डॉक्टर च्या आग्रहामुळे आम्हाला ही त्या सोयी चा उपयोग झाला.
इतका होऊन प्रवास संपेल तर तस ही नव्हतं, त्या नंतर अजून थोडं चालून रॅपलिंग होतं, तिथे आल्यावर कळाल या आधी केलं ते खरच खूप सोप्पं होता, इथे आम्हाला बांधलं होता पण आमच्या हातात काहीच नव्हतं, समोरचा पार्सल खाली सोडावं तस सोडणार होता, माझं एकतर वजन जास्त त्यात ह्याला मी कसा काय पेलवणार याची भीती जास्त, कसतरी पार केल बाबा, कस केलं हे पाहायला ही मी उतरल्यावर मागे पहिला नाही, सुहास खाली उभाच होता आम्हाला सुखरूप उतरवायला. प्रसाद चा पाय आता मात्र त्याला जवाब देत होता, मला ही फार आधी पासून पायाचा त्रास आहे तो ही सुरू झाला, म्हणून मनात असला तरी प्रसाद ला हवी तशी मदत करत येत नव्हती. नंतर चालून चालून एक जागा दिसली, जिथे खूप tents लागले होते, फार खुश झालो की पोहचलो बाबा एकदाच, कारण सकाळी 8 च्या उजेडात सुरू झालेली ट्रेक आमच्या स्पीड ने संध्याकाळी 6 च्या काळोखात ही संपला नव्हता। खाली येउन कळाल की आमची कॅम्प साईट अजून लांब आहें, आता मात्र आमच्या सगळ्यांच्या पायांनी ताकद सोडली की काय असं वाटत होतं, पण पर्याय ही नव्हता. मोबाईल च्या टॉर्च च्या उजेडात पुढे निघालो. शेवटी पोहचलो बाबा आमच्या tent च्या जागी, मस्त गरम गरम चहा झाला, आणि आम्ही त्याच वेळी झोपायच्या तैयारीत, जेवण होता पण माझी जेवायची ही इच्छा नव्हती, साई च्या ताटातली अर्धी भाकरी खाल्ली आणि झोपलो आम्ही, गरम होत असल्याने तशी झोप ही लागत नव्हती.
नवीन दिवस उगवला, आणि पाय दुखून गळ्यात आल्याची जाणीव झाली. सकाळी PD तिळाचे लाडू देऊन( जे राधा ने आणले होते) सर्वाना संक्रांतीच्या शुभेच्छा देत होता, त्याच मागे आमचे डॉक्टर तितक्यात मनपूर्वक लाडू देत होते, काहींना तर खाल्यावर कळाल डॉक्टर लाडू नव्हे तर बटर देऊन सर्वांचा एप्रिल फुल करत होते.
मग चालू झाला परतीचा प्रवास, खूप चाललो, त्या वेळी अर्धा ग्रुप पुढे गेला, प्रसाद आणि महेश मागे राहिले, बराच वेळ मी एकटाच होतो, नंतर PD आणि बाकीचे थोडे भेटले, ते पण मागे पुढे होत होते, मग राधा मी आणि सविता बराच वेळ सोबत चालत होतो गप्पा मारत, मग आलो एका नदीजवळ, सगळे मस्त पाण्यात उतरले, मज्जा करत होते, मला त्या वेळी भिजयची इच्छा होत नव्हती म्हणून नाही गेलो. नंतर तिथे जेवण आटोपून परतीचा प्रवास चालू झाला.
थकणारा असला तरी खूप काही अदभुत पूर्व आणि धाडसी असा ट्रेक झाला. याची आठवण कायमच राहील. सोबत असलेल्या ग्रुप आणि वाटेत मिळालेल्या ग्रुप ची ही मदत आणि सोबत होती म्हणून हे सहज शक्य झालं.
आता निरोप घेतो, माझ्या लिखाणात किंवा ट्रेक मध्ये काही वागण्या- बोलण्यात काही चूक झाली तर क्षमस्व.
धन्यवाद.
दर्शन कामत.